
आदर्श ग्राम पळसगाव बाई येथे कार्तिक एकादशीनिमित्त भव्य दिंडी सोहळा उत्साहात संपन्न*
- श्री. धीरज लेंडे

- Nov 3
- 1 min read
पळसगाव बाई (ता. सेलू) – महाराष्ट्रातील विठ्ठल भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानली जाणारी कार्तिक एकादशी या दिवशी आदर्श ग्रामपंचायत पळसगाव बाई येथे महाराष्ट्र शासनाकडून ‘ब’ दर्जा प्राप्त श्री संत सखुबाई देवस्थान तसेच ग्रामस्थ विठ्ठल भक्तांच्या वतीने भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. भक्तिभाव, हरिनामाचा गजर आणि टाळ-चिपळ्यांच्या निनादात गाव भक्तीमय वातावरणाने भारावून गेले.
सकाळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची महापूजा, अभिषेक, आरती दिवसाची सुरुवात झाली. भक्तगणांनी एकत्र येऊन हरिनामाचा जप करीत विठ्ठल भक्तीचा आनंद लुटला. दुपारी कीर्तन व प्रवचनातून संत साहित्याचा आणि संतांच्या शिकवणीचा संदेश देण्यात आला.
सायंकाळी श्री संत सखुबाई देवस्थान परिसरातून निघालेल्या दिंडीला गावातील सर्व वयोगटातील भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हरिनामाच्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या तालावर दिंडी संपूर्ण गावातून फिरली. दिंडीमध्ये महिला मंडळ, युवक मंडळ, तसेच बालगोपाळ यांचा विशेष सहभाग होता. विठ्ठलाचे नामस्मरण करत सर्व भक्तांनी भक्तीरसात चिंब झालेला अनुभव घेतला.
दिंडीची सांगता देवस्थान येथे आरती व महाप्रसादाने करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन देवस्थान समिती, तसेच गावातील सर्व भक्तांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडले.
संपूर्ण गाव भक्ती, समर्पण आणि एकतेच्या भावनेने उजळून निघाले होते. कार्तिक एकादशीच्या निमित्ताने पळसगाव बाई गावाने पुन्हा एकदा ‘भक्तीमय परंपरेचे जतन करणारे आदर्श ग्राम’ म्हणून आपला ठसा उमटवला.




Comments