
Untitledआदर्श ग्रामपंचायत पळसगाव बाई येथे महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली
- श्री. धीरज लेंडे

- Dec 6, 2025
- 2 min read
आदर्श ग्रामपंचायत पळसगाव बाई येथे महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली
आदर्श ग्रामपंचायत पळसगाव बाई येथे भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवतावादी विचारवंत आणि सामाजिक परिवर्तनाचे महान पुरस्कर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन श्रद्धाभावाने साजरा करण्यात आला. समाजातील सर्व घटकांना न्याय, समता आणि बंधुता यांचे मोल शिकवणाऱ्या या महामानवाच्या स्मृतिदिनानिमित्त ग्रामपंचायत परिसरात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करीत त्यांच्या महान कार्याची आठवण जागवली.
ग्रामपंचायत माजी सरपंच धीरज लेंडे यांनी बाबासाहेबांच्या तत्त्वज्ञानाचे आजच्या काळातील महत्त्व सांगताना समाजातील सर्व घटकांनी समानतेचा ध्यास घेतला पाहिजे, असे सांगितले. तर माजी उपसरपंच सौ. शारदाताई बोरकुटे यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी बाबासाहेबांनी उचललेल्या पावलांचा विशेष उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, बाबासाहेबांनी शिक्षणाला दिलेले प्राधान्यच खऱ्या अर्थाने समाजपरिवर्तनाची गुरुकिल्ली ठरली.
कार्यक्रमास सौ. वैशालीताई गोल्हर यांनी उपस्थित राहून बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांवर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, ग्रामविकासाच्या प्रत्येक क्षेत्रात बाबासाहेबांची सामाजिक समता आणि न्यायाची शिकवण मार्गदर्शक ठरते. मुख्याध्यापिका सौ. सुनीता लेंडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये संविधान मूल्ये रुजविण्यासाठी शाळेत सातत्याने उपक्रम राबवले जात असल्याचे सांगितले. डॉ. आंबेडकरांचे विचार पुढील पिढ्यांनी आत्मसात करणे गरजेचे असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.
ग्रामसेवक धीरज शिरपाते यांनी महापरिनिर्वाण दिनाचे महत्त्व स्पष्ट करताना ग्रामपंचायत व शासकीय यंत्रणेत बाबासाहेबांनी दिलेल्या समानतेच्या मूल्यांचा आधार घेत कार्य करण्याचे आवाहन केले. प्रशासक श्री. लवणे यांनी ग्रामविकासासाठी संविधानातील लोकशाही मूल्यांचे पालन करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
कार्यक्रमाला शाळेतील शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्रितपणे संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून राष्ट्रनिर्माणात आपले योगदान देण्याची प्रतिज्ञा केली.
ग्रामपंचायत परिसरात विशेष स्वच्छता मोहिम राबवून परिसर स्वच्छ व सुव्यवस्थित ठेवण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे दर्शन घडवणारे फलक व घोषवाक्ये लावून कार्यक्रमानिमित्त सामाजिक जागरूकता वाढवण्यात आली. उपस्थित नागरिकांनी एकमुखाने सांगितले की अशा उपक्रमांमुळे गावात सामाजिक सौहार्द, एकता आणि जागरूकतेचे वातावरण निर्माण होते.
महापरिनिर्वाण दिन हा केवळ स्मरणाचा दिवस नसून, बाबासाहेबांच्या विचारांनुसार समाजात समानता, शिक्षण, बंधुता आणि प्रगतिपथाचा मार्ग अनुसरण्याची नवी प्रेरणा देणारा दिवस असल्याचे सर्वांनी नमूद केले. आदर्श ग्रामपंचायत पळसगाव बाईचा हा प्रेरणादायी उपक्रम सर्वांसाठी आदर्शवत ठरला आहे.







Comments